Friday, March 13, 2015

धागा धागा अखंड विणूया- भाग - 2 - सचिन रेगे

कष्ट करूनही स्वत:च्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी असमर्थ असलेल्या कष्टकरी समाजाला, त्यांच्या निरागस बालकांना तसेच वृद्ध निराधार व्यक्तींना वस्त्र पुरवणं हाच वस्त्र योजना सुरू करण्यामागचा मूळ हेतू.

डॉ.अनिरुद्धांनी जेव्हा जेव्हा कोणतीही अशी नवी योजना जाहीर केली आहे, तेव्हा तेव्हा त्या योजनेबद्दलचे संपूर्ण तपशील त्यांच्या डोक्यात तयार असतात आणि त्यांची कोणतीही योजना अशीच असते की इच्छा असणार्‍या कोणालाही त्यात सहजपणे सहभागी होता येईल आणि प्रत्येकासाठी त्यात काही ना काही सहभागाची निश्चिती असते. मग कोणी श्रमदान करून सहभागी होईल, तर वेळ देऊ न शकणारा कोणी आर्थिक दान करून.

१३ कलमी योजना जाहीर करतानाच ‘येरवडा चरखा’ आणि ‘अंबर चरखा’ आदि दोन प्रकारचे चरखे अनिरुद्धांनी प्रस्तुत केले होते. त्यापैकी सध्याच्या काळाला योग्य, दर्जेदार आणि जलद उत्पादन घेण्यासाठी ‘अंबर चरखा’ निवडण्यात आला. २ स्पिंडल, ४ स्पिंडल, ६ स्पिंडल, ८ स्पिंडलचे  अंबर चरखे उपलब्ध आहेत. जशी स्पिंडलची संख्या जास्त तसे अधिक स्पिंडलचा वापर करून एका वेळी जास्त सूत कातणं  शक्य होतं.

श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने केवळ चरखेच वितरीत करण्याचे कार्य केलेले नाही. चरखे वितरीत करण्याबरोबरच घरोघरी फिरणारे हे चरखे नियमित फिरते राहण्यासाठी चरख्यांची देखभाल करणार्‍या प्रशिक्षितांचा गटही तयार केलेला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, धुळे, जळगांव आदि ठिकाणी श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनचे थोडे थोडके नव्हे तर तब्बल साडेतीनशेपेक्षा जास्त स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे. या प्रत्येकाला चरखा दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. एखाद्याच्या घरचा चरखा नादुरुस्त झाला तर हे स्वयंसेवक घरी जाऊन विनामुल्य चरखा दुरुस्ती करतात. केवळ चरखाच नव्हे तर चरख्याची देखभाल करण्याची व्यवस्थाही झाल्याने हळूहळू वस्त्र योजनेने बाळसे धरले. मग ह्या योजनेचे असंख्य पैलू समोर येऊ लागले. आता ह्या योजनेचा व्याप म्हणजे एखाद्या स्वतंत्र छोटेखानी कॉर्पोरेटहाऊसच्या व्यापाएवढा झाला आहे.


चरखे, कापसाचे पेळू लोकांना कमीतकमी किंमतींत अबाधितपणे उपलब्ध करून देणं हे संस्थेपुढील सर्वात मोठं आव्हान होतं. हे आव्हान यशस्वीपणे पेलताच हा जगन्नाथाचा रथ ओढायला एकेक हात स्वतःहून पुढे येऊ लागला. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची टीम वाढू लागली. सुरुवातीला हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढी संख्या असणारे कार्यकर्ते वाढत वाढत आज साडेतीनशेच्या घरात पोहोचले आहेत.


पण आता ह्या योजनेचा व्याप इतका वाढला आहे की ह्यापुढे कितीही कार्यकर्ते प्रशिक्षित झाले, तरी त्यांची चणचण नेहमीच भासणार. ही अडचण येणारच आहे, हे ओळखून संस्थेने चरखा चालविणार्‍या प्रत्येक श्रद्धावानालाच चरख्याची माहिती असावी व शक्यतो चरख्याची दुरुस्ती करण्यासाठी कार्यकर्त्यांची गरजच पडू नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच चरखा दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकाला स्वावलंबी करण्याचा निर्धार केला आहे.


चरखा वापरणार्‍या प्रत्येकाला चरख्याची इत्यंभूत माहिती झाल्यास शहरातील सूत कताईतील मोठा अडथळा दूर होऊ शकेल.

चरखा चालविणार्‍या स्वयंसेवकास माहिती असणे आवश्यक :-

१.     अंबर चरखा - रचना व मूलभूत कार्य

२.    चरखा चालू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

३.    चरखा ऑइलिंग करण्यासंबंधीची माहिती

४.    पेळू स्टँडवर लावण्याची पद्धत

५.    पेळूपासून सूत बनण्याची क्रिया - महत्त्वाचे मुद्दे

६.    स्पिंडल व गतिचक्रावर वादी लावण्याची पद्धत

७.    बॉबीन स्पिंडलवर लावण्याची पद्धत

८.    नथणी रिंग (ट्रॅव्हलर रिंग) पट्टीचे सेटींग

९.    लॅपेट गाईडचे सेटींग

१०.    आयडल्र पुलीचे सेटींग

११.    रबर गुटका व रबर ऍप्रनचे कार्य व त्यासंबंधी महत्त्वाची माहिती

१२.    चरख्याची स्वच्छता

१३.    चरखा बंद करण्यापूर्वी

१४.    सुतापासून लडी बनविण्याची क्रिया  

१५.    लडी बनविताना घ्यावयाची काळजी

१६.    अंबर चरखा स्पेअर पाटर्स

प्रत्येक चरखा चालविणार्‍यांनी ही दक्षता घेणे गरजेचे आहे. व्यवस्थित माहिती करून घेऊन चरखा चालविला तर श्रम वाया न जाता पेळूपासून उत्तम दर्जाचे सूत कातणे शक्य होईल.

मी जेव्हा चरखा चालवितो तेव्हा मुखाने नामस्मरणही करत राहतो. मंत्राच्या बरोबरच सेवा घडत राहते.  ह्यामुळे मी माझ्या जीवनात ज्या सूडचक्रात, दुष्टचक्रात अडकलो आहे, त्यामधून माझी हळूहळू सुटका होऊन मी माझा परमार्थ संसारात राहूनसुद्धा चांगल्या रितीने पार पाडू शकतो.

म्हणजेच मला परमार्थ व प्रपंच जर नीटनेटका करायचा असेल तर मला भक्ति आणि सेवेचा संगम घडवून आणावयास पाहिजे.

चरखा चालविताना माझ्याकडून होणार्‍या शारीरिक श्रमाचे रूपांतर शेवटी भक्तिमय सेवेत होते - जसे माझ्या श्रमातून तयार झालेल्या सूताचे रूपांतर शेवटी वस्त्र बनण्यात होते. या वस्त्रांची माझ्या कष्टकरी गरजू, निराधार देश बांधवांना अत्यंत गरज आहे.


ह्या योजनेबद्दल सांगताना श्री अनिरुद्ध म्हणतात,

    ‘‘जर तुम्ही प्रत्येकाने रोज किमान एक तास चरखा चालविण्याचे श्रम घेतलेत तर कित्येक खेडेगावांमधील हजारो गरजू लोकांना व बालकांना वस्त्र पुरविणे सहज शक्य होईल.’’


कलियुगात पुण्य कमाविण्यासाठी आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी ‘यज्ञेन दानेन तपसा’ हा मार्ग सांगितला आहे आणि नामजप हाच कलियुगातील यज्ञ आहे. त्याचबरोबर दान ह्या दुसर्‍या पैलूमध्ये धनदानापासून श्रमदानापर्यंत अनेक प्रकार येतात. इथे आपण चरखा चालवून श्रमदान करतो व मुखाने नामस्मरण केल्याने आपला यज्ञ सुरूच असतो. हे दोन्ही एकत्रितपणे करणं हेच तप आहे. म्हणजेच चरखा चालविणे हा हे तिन्ही करण्याचा सोपा मार्ग आहे. आणि म्हणूनच मला उमगले पाहिजे की माझे आणि चरख्याचे काय नाते आहे. त्यासाठी अंबर चरख्याची रचना व मूलभूत कार्य मला नीट माहीत पाहिजे.


चरख्याचे ऑईलिंग :

चरखा चांगल्याप्रकारे कार्यरत राहण्यासाठी व सूत निघण्यासाठी चरख्यामधील गियर्स, गतीचक्र,  स्पिंडलच्या फेर्‍याअडथळा येता कामा नये. यासाठी चरख्याच्या ठराविक भागांमध्ये  नियमितपणे  मशिन ऑईल टाकणे आवश्यक आहे.


खालील ठिकाणी रोज तेल टाकणे :

नथणी रिंगच्या आतील व बाहेरील पृष्ठभागावर नियमितपणे तेल चोळणे. नथणी कोणताही अडथळा न येता वेगाने फिरली पाहिजे यासाठी नथणी रिंगचा पृष्ठभाग नेहमीच सुका न राहता तेलकट असला पाहिजे. स्पिंडल बोस्टर स्लिवमध्ये व्यवस्थित फिरली पाहिजे यासाठी बोस्टरमध्ये रोज नियमितपणे तेल सोडणे.


यार्न वाईंडिंग चक्रावर धागा गुंडाळण्याचे काम चालू असताना जर मध्येच धागा तुटल्यास गाठ बांधून न जोडता तुटलेल्या धाग्याची दोन्ही टोके प्रथम एकमेकांस जोडून त्यांस पीळ देणे. धाग्याचा पीळ दिलेला भाग घडी करून मुख्य धाग्यास जोड देऊन धागा हळूवारपणे चक्राचा दांडीवर ठेवून त्यावर हाताच्या बोटांनी दाब देऊन हँडलचा एक  फेरा पूर्ण करा व धागा गुंडाळण्याची क्रिया पुढे चालू ठेवा.

काही वेळा काउंटर काउंटर-रॉडवर नीट न सरकल्यामुळे (उडत उडत पुढे-मागे सरकल्यामुळे) चक्राच्या दांडीवर गुंडाळल्या  जाणार्‍या धाग्यांचे फेरे २०० पेक्षा कमी वा अधिक होतात. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास लडीसाठी लागणार्‍या धाग्यांचे  फेरे १००० पेक्षा कमी वा जास्त होतील, म्हणजेच तयार होणारी लडी खूप पातळ वा जाडी होईल. अशा कमी दर्जाच्या लड्या  कापड बनविण्याच्या पुढील प्रक्रियेसाठी वापरणे त्रासदायक होते.

चरख्याची गती कायम ठेवण्यासाठी किमान १५ दिवसातून एकदा चरख्याच्या दोन्ही बाजूस असलेले पॅडस्टल बेअरिंग, स्क्वेअर नायलॉन बुश, ठराविक गीयर्सच्या बुशवरील छिद्रामध्ये पातळ मशीन तेलच सोडावे. तेल सोडताना जरूरीपेक्षा जास्त तेल पडणार नाही आणि रबर ऍप्रन्स, रबर रोलर्स व धारीधार रोलर्सवर तेल सांडणार नाही याची दक्षता घ्यावी. हे भाग तेलकट झाल्यास कापूस पिळण्याची क्रिया नीटपणे होणार नाही. दोन्ही बाजूंचे पेळू स्टँडवर अडकविताना दोन्ही पेळूंची बाहेरील टोके परस्परविरुद्ध दिशेला असावीत. नसल्यास, जेव्हा पेळू पूर्ण भरलेले असतात, तेव्हा पेळूंची बाहेरील टोके एकमेकांस घासून धागा तुटू शकतात.

चरख्याचे हँडल फिरविण्याची गती अती वेगाने वा धिमी असता कामा नये. अती वेगाने हँडल फिरविल्यास वादी स्पिंडल पुलीवरून घसरण्याची शक्यता असते. स्पिंडल कमी वेगाने फिरल्यास धागा कच्चा बनतो. हँडल  फिरविण्याच्या गतीमध्ये समतोल व सातत्य राखणे आवश्यक आहे.

चरखा चालवीत असताना तुमची चरख्यासमोर बसण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. वेडेवाकडे बसल्यास, शरीरावर अती ताण येईल व चरखासुद्धा नीट चालणार नाही. तयार झालेल्या १००० फेर्‍यांचा संच यार्न वाईंडिंग चक्राच्या दांडीवरून बाहेर काढून दोन्ही हातांनी ताणून धरावी १००० फेर्‍यांच्या संचाचे एक टोक पायाच्या अंगठ्यामध्ये अडकवून दुसरे टोक दोन्ही हातात पकडून हळू हळू पीळ देणे.

अशाप्रकारे संपूर्ण संचाला पीळ देणे पीळ अती घट्ट वा सैल असता कामा नये. पीळ दिलेल्या संचाची मध्यावर घडी करणे. घडी केलेल्या संचाची दोन्ही टोके एकमेकांत घट्टपणे अडकविणे.  तयार झालेल्या लडीला सुबक आकार येण्यासाठी लडी स्वच्छ पृष्ठभागावर ठेवून तिला दोन्ही हातांच्या तळव्याने लाटावी. लडी बनविण्याची क्रिया चालू करण्यापूर्वी चरख्याचे सेटींग करणे. बॉबीनवरील धाग्याचे सुरूवातीचे टोक यार्न वाईंडिंग चक्राच्या दांडीवर बांधा.

बॉबीनवरील धाग्याचे सुरूवातीचे टोक यार्न वाईंडिंग चक्राच्या दांडीला अडकविणे. काऊंटर, काऊंटर-रॉडवर सुरूवातीच्या जागी आणून ठेवणे व तो पुढे नीटपणे सरकतो का याकडे लक्ष द्या. दोनशे फेर्‍यांच्या संचाला दोर्‍यांनी बांधणे. यानंतर पुढील दोनशे फेर्‍यांसाठी धाग्याचे टोक स्क्रू आय पट्टीच्या दोन क्रमांकाच्या हुकमध्ये घालून धागा गुंडाळण्याची क्रिया चालू ठेवावी. अशाप्रकारे एकूण १००० फेरे (म्हणजेच २०० फेर्‍यांचे ५ संच) पूर्ण झाल्यानंतर धाग्याच्या बाहेरील टोकांनी सर्व संच एकत्रित बांधणे.

पेळूपासून उत्तम दर्जाचा धागा बनण्यासाठी घ्यावयाची दक्षता कापसाचे तंतू ताणले जाऊन विरळ होण्याची व पसरण्याची क्रिया योग्य रितीने होणे गरजेचे असते. कापसाला ठराविक गतीने पीळ दिल्यास धागा मजबूत होतो. तयार झालेला धागा बॉबीनवर ठराविक जागी वरपासून खालपर्यंत नीटपणे गुंडाळावा.

उत्तम दर्जाचे कापड तयार करण्यासाठी उत्तम दर्जाचा धागा बनणे आवश्यक आहे. पेळूपासून धागा बनण्याच्या क्रियेत गतीचक्र व स्पिंडलवर फिरणारी वादी फार महत्त्वाचे काम करते. पिंजलेल्या कापसाला पीळ देण्यासाठी बॉबीनला गोल फिरविण्याचे काम वादी करते. यासाठी वादी गतीचक्रावर पुरेशा प्रमाणात घट्ट बसली पाहिजे. तरच गती चक्र पूर्ण गतीने फिरू शकेल. चरखा हँडलच्या एका फेर्‍यामध्ये बॉबीन जर ठराविक गतीने फिरली तरच धागा मजबूत बनेल. यासाठी बॉबीन स्पिंडलवर घट्ट बसली पाहिजे, सैल असता कामा नये. स्पिंडल बोस्टर स्लिव्ह मध्ये कोणताही अडथळा न येता नीट फिरली पाहिजे. म्हणून बोस्टर तेलाने भरलेला असावा.

वादी स्पिंडलच्या खाचेमध्ये घट्ट बसली पाहिजे. सैल बसल्यास वादी स्पिंडलवर घसरल्यामुळे बॉबीन फिरण्याच्या क्रियेत अडथळा येऊन पीळ कमी पडल्यामुळे  धागा कच्चा होतो. चरख्याच्या सततच्या वापरामुळे वादी सैल होते व त्यामुळे बॉबीन पुरेशा गतीने फिरणार नाही व धागा कच्चा होतो. त्यासाठी वादीच्या घट्टपणावर नियमित लक्ष ठेवणे. आवश्यक असेल तेव्हा वादी बदलणे. चरखा डिपार्टमेंटमधून दिल्या जाणार्‍या वादी बंडलचाच उपयोग करावा, दुसरी कोणतीही  दोरी वापरू नका.  याबरोबरच बॉबीन स्पिंडलमध्ये टाकताना दक्षता घेणे आवश्यक आहे. बॉबीन स्पिंडलवर व्यवस्थित बसली पाहिजे, सैल बसल्यास धागा कच्चा बनेल.

चरखा बंद करून ठेवण्यापूर्वी ब्रश वा कपडा वापरून चरख्यावर जमा झालेले धुळीचे कण व कापसाचे तंतू काढून टाकावेत. नथणी रिंगच्या पृष्ठभागावर बोटाने तेल चोळावे. क्रेडल अन-लॉक स्थितीमध्ये आणावा. चरखा व पेळू पूर्णपणे झाकून ठेवल्यास चरखा व्यवस्थित राहिल. त्यातही चरखा कायम सुस्थितीत ठेवण्यासाठी चरखा नियमीत वापरात असणे जरूरीचे आहे.


॥ चरखा चालविताना म्हणावयाचा मंत्र॥

...शरण्ये चण्डिके दुर्गे, अनिरुद्ध माते नमोस्तुते...

No comments:

Post a Comment