जानेवारीला नवीन वर्षाचे चक्र सुरू होते. चक्राकार गति हा ह्या सृष्टीचा मूलभूत नियम आहे. आम्हाला ऋतुचक्र ठाऊक असते, विज्ञानात आम्ही ऊर्जाचक्र (एनर्जी सायकल), विविध वायुंचे चक्र शिकतो. मानवाच्या शरीरातदेखील जैविक चक्र कार्यरत असते. ह्या चक्राच्या कार्यामुळेच मानव सकाळी उठतो, त्यानंतर त्याच्या शरीरातील विविध संस्था, विविध रस यांची विविध कार्ये होतात. पर्जन्याचे चक्र, जलचक्र आम्हां सर्वांना ठाऊकच असते. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग बनतात. त्या ढगांमुुळे पडणार्या पावसाचे पाणी नद्यांमधून वाहू लागते आणि नद्यांद्वारे पुन्हा सागराला जाऊन मिळते.
सृष्टीतील ह्या विविध चक्रांचे महत्त्व प्राचीन ऋषिमुनींनी जाणले होते. मोहेंजोदाडो येथील उत्खननात चार आर्या असलेले एक चक्र कोरलेले आढळून आले, ज्याची सूर्याचे प्रतीक म्हणून अर्चना केली जात होती. रामायणात असा उल्लेख मिळतो की चक्रवाक पर्वतावर (आजच्या सौराष्ट्रातील) विश्वकर्म्याने एक हजार आस असलेले एक चक्र निर्माण केले होते. हे चक्र म्हणजे सूर्य आणि त्याचे सहस्त्र आस म्हणजे सूर्याची सहस्त्र किरणे. विष्णुचे सहस्त्र पाद बनले, सूर्यच विष्णुचे सुदर्शन चक्र बनला, गरुडरूपी सूर्यच त्याचे वाहन बनला, सूर्याची सुवर्णपीत प्रभा विष्णुचे पीतांबर बनले आणि सूर्यविकासी कमळही विष्णुच्या हाती स्थिरावले. श्रीविष्णुच्या हातातील सुदर्शन चक्र हे सर्वश्रेष्ठ आयुध बनले, श्रद्धावानांचा प्रतिपाळ करणारे आणि श्रद्धाहिनांना नाश करणारे.