Thursday, November 13, 2014

चरखा: चक्रशक्ति आणि मंत्रशक्ति यांचा सुवर्णसंगम


जानेवारीला नवीन वर्षाचे चक्र सुरू होते. चक्राकार गति हा ह्या सृष्टीचा मूलभूत नियम आहे. आम्हाला ऋतुचक्र ठाऊक असते, विज्ञानात आम्ही ऊर्जाचक्र (एनर्जी सायकल), विविध वायुंचे चक्र शिकतो. मानवाच्या शरीरातदेखील जैविक चक्र कार्यरत असते. ह्या चक्राच्या कार्यामुळेच मानव सकाळी उठतो, त्यानंतर त्याच्या शरीरातील विविध संस्था, विविध रस यांची विविध कार्ये होतात. पर्जन्याचे चक्र, जलचक्र आम्हां सर्वांना ठाऊकच असते. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग बनतात. त्या ढगांमुुळे पडणार्‍या पावसाचे पाणी नद्यांमधून वाहू लागते आणि नद्यांद्वारे पुन्हा सागराला जाऊन मिळते.

सृष्टीतील ह्या विविध चक्रांचे महत्त्व प्राचीन ऋषिमुनींनी जाणले होते. मोहेंजोदाडो येथील उत्खननात चार आर्‍या असलेले एक चक्र कोरलेले आढळून आले, ज्याची सूर्याचे प्रतीक म्हणून अर्चना केली जात होती. रामायणात असा उल्लेख मिळतो की चक्रवाक पर्वतावर (आजच्या सौराष्ट्रातील) विश्‍वकर्म्याने एक हजार आस असलेले एक चक्र निर्माण केले होते. हे चक्र म्हणजे सूर्य आणि त्याचे सहस्त्र आस म्हणजे सूर्याची सहस्त्र किरणे. विष्णुचे सहस्त्र पाद बनले, सूर्यच विष्णुचे सुदर्शन चक्र बनला, गरुडरूपी सूर्यच त्याचे वाहन बनला, सूर्याची सुवर्णपीत प्रभा विष्णुचे पीतांबर बनले आणि सूर्यविकासी कमळही विष्णुच्या हाती स्थिरावले. श्रीविष्णुच्या हातातील सुदर्शन चक्र हे सर्वश्रेष्ठ आयुध बनले, श्रद्धावानांचा प्रतिपाळ करणारे आणि श्रद्धाहिनांना नाश करणारे.




मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये आम्ही वाचतो की महाविष्णुने मधु-कैटभ या आद्य असुरद्वयांचा नाश सुदर्शनचक्रानेच केला. ह्या विश्‍वात अगदी पहिल्यापासून ह्या चक्रगतिचे कार्य चालत आले आहे. दुष्टचक्र, जे असुरांद्वारे संचलित केले जाते, त्याचा नाश सुष्टचक्राद्वारे परमात्मा करतो. असुर कायम विघातक चक्राला गति देऊन करत असतो. असुरांचा अपकारक चक्राचा नाश भगवंत अपकारक चक्राला गतिमान बनवून करतो. कालचक्राची विपरित गतिही भगवंत त्याच्या कालचक्राद्वारे नियंत्रित करतो, तिला पुन्हा उचित बनवतो.

सारांश, ‘चक्र’ हा ह्या सृष्टिचा एक अपरिहार्य भाग आहे. प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या चक्राच्या गतित फिरावेच लागते. आम्ही जर प्रगतिचक्राला नकार दिला तर आम्ही आपोआपच अधोगतिचक्रात अडकतो. आम्ही जर सृजनात्मक कार्याच्या चक्रात सहभागी झालो नाही तर आम्ही विनाशचक्राचा एक घटक बनतो. त्यामुळे प्रत्येक मानवाने सदैव जागृत राहून सृजनात्मक विधायक कार्यचक्राचा एक हिस्सा बनणे गरजेचे आहे.

परमात्म्याला आवडतात, ते असे विधायक पवित्र कार्यचक्रात सहभागी होणारे श्रद्धावानच. जेव्हा आम्ही अशा विधायक पवित्र कार्यचक्राचा हिस्सा बनतो, तेव्हा आम्ही आपोआपच भगवंताच्या सुदर्शन चक्राच्या छायेत येतो आणि आमच्या जीवनात परमेश्‍वरी मर्यादा चक्र सक्रिय होते. आम्हां भारतीयांनी अशाच एका चक्राशी एका महात्म्याने ओळख करून दिली, ते चक्र म्हणजेू ‘चरखा’.

चरखा हा शब्दच मुळी ‘चक्र’ ह्या शब्दापासून बनला आहे. चरखा, ज्याला पूर्वीच्या मराठीत काही ठिकाणी ‘चरका’ असेही संबोधन आहे, तो चक्र शब्दावरूनच निर्माण झाला आहे. चक्राकार गति करणारा तो चरखा. चरखा हे आमच्या जीवनात विधायक चक्र गतिमान करते, सुदर्शन चक्राची सावली आम्हाला प्रदान करते.

श्रीअनिरुद्धांनी जाहिर केलेल्या १३ कलमी कार्यक्रमातील पहिले कलम आहे, वस्त्र योजना-‘चरखा’. ह्या चरखा योजनेद्वारे श्रद्धावान चरख्यावर स्वत: सूत करतात व त्या सुतापासून बनलेल्या वस्त्रांचे, गणवेशांचे गरजू कष्टकरी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येते. ह्याचाच अर्थ हा चरखा आम्हाला परमेश्‍वरी विधायक चक्राचा एक हिस्सा बनवतो. आम्ही चरखा चालवून स्वत:पुरते वस्त्र निर्माण करणे ही आमची स्वत:ची, गरज भागवणे असेल, तर जेव्हा आम्ही आमच्या गरजू बांधवांसाठी निरपेक्ष प्रेमाने चरखा चालवून सूत काततो आणि ते आमचे प्रेमळ कर्तव्य आहे हाच आमचा भाव असतो, तेव्हा निश्‍चितच हा चरखा आम्हाला परमात्म्याच्या पावित्र्य विधायक कार्यचक्राचा एक हिस्सा बनवतो.

श्रद्धावानांच्या नऊ निष्ठांमधील एक निष्ठा आहे- ‘कर्माचा अटळ सिद्धांत’ मधुफलवाटिकेतील ९४ वे मधुफल सांगते-
जसा ध्वनि तसाच प्रतिध्वनि, जसे बिंब तसेच प्रतिबिंब आणि जशी साद तसाच प्रतिसाद, हा निसर्गनियम नीट लक्षात घ्या. कारण ह्या निसर्गनियमानेच प्रत्येक मानवाचे जीवन घडत असते. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया.
श्रीसाईनाथांच्या शब्दांत


‘जो जो जैसे जैसे करील| तो तो तैसे तैसे भरील|
ध्यानात ठेवी जो माझे बोल| सौख्य अमोल पावेल तो॥
श्रीसाईसच्चरित ३२/१६८

आम्ही जेव्हा चरख्यावर सूत कातून त्याद्वारे आमच्या कष्टकरी गरजू बांधवांच्या जीवनात, विशेषत: त्या लहान लहान बालकांच्या जीवनात आनंद निर्माण करतो, त्यांना त्यांचा जीवनाविकास साधण्याची म्हणजेच शिक्षणाची संधी मिळावी म्हणून मदत करतो, तेव्हा कर्माच्या अटळ सिद्धांतानुसार परमात्माही आमच्या जीवनात आनंद निर्माण करतोच आणि आम्हाला जीवनविकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देतो.

हा झाला चरख्याच्या उपयोगितेचा एक भाग. एक एवढ्यावरच ह्या चरख्याची गाथा थांबत नाही, संपत नाही. हा चरखा आम्हाला भरभरून ऊर्जा प्रदान करतो. चरखा चालवणे ही काहीजणांना एक यांत्रिक कवायत वाटेल. पण तसे नाही. श्रद्धावान ह्या योजनेत जेव्हा चरखा चालवतात, तेव्हा त्यामागील पवित्र भाव, जो आपण याआधीच पाहिला आहे, तो तर त्यांच्याठायी असतोच, पण त्याचबरोबर श्रद्धावान चरखा चालवताना परमात्म्याचा मंत्रही जपतात, म्हणजेच चक्राला साथ असते मंत्राची.

मंत्र-चक्राचे हे नाते आम्हाला वेदांमधील मित्र-वरुणाच्या नात्याची आठवण करून देते. हे मित्र-वरुण एकत्रित रूपात ह्या सृष्टिला ऊर्जा, गतिही प्रदान करत असतात व त्याचबरोबर ती नियंत्रितही करत असतात. प्रदान केलेली ऊर्जा, गति ही चुकीच्या दिशेने न जाता ती उचित दिशेनेच कार्यकारी व्हावी हे या दोहोंचे एकत्रित कार्य आहे. चरखा चालवतानाचे मंत्र-चक्र हे इथही आमच्या जीवनात असेच कार्यकारी आहे. मंत्राद्वारे आम्हाला बल प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते, पण ती शक्ती चुकीच्या दिशेने वापरली न जाता उचित दिशेनेच वापरली जावी याची काळजी चक्र घेते. मंत्र व चक्र यांचा एकत्रित वापर म्हणजे जणू मानवाला सामर्थ्य प्राप्त करण्याची आणि ते उचितपणे वापरण्याची अनमोल देणगी देणारे वरदानच आहे.

मंत्र व चक्र यांचा हा सुवर्णसंगम मानवाकडून त्याला मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याचा अनुचित वापर होणार नाही याची काळजी घेते. आम्हाला मिळालेल्या कर्म स्वातंत्र्याचा उचित वापर कसा करावा? तो अनुचित होऊ नये म्हणून काय करावे? असे प्रश्‍न आम्हा भेडसावत असतात. ‘चरखा’ हे त्याचे उत्तर आहे. चरचा हा मंत्र-चक्र ह्या दोन शक्तींची मोट बांधून आम्हाला आमच्या कर्मस्वातंत्र्याचा उचित वापर घडवून आणण्यासाठी सहाय्यक ठरतो.

आम्हां मानवांचे जीवनही मंत्र व चक्र ह्या दोन शक्तींद्वारेच संचलित केले जाते. आमची हृदयक्रिया ही त्याचे उत्तम उदाहरण आहे. हृदयाद्वारे रक्ताचे अभिसरण केले जाते. हृदयाकडून रक्त सर्व शरीरभर पाठविले जाते आणि मग पुन्हा ते हृदयाकडेच आणले जाते. म्हणजे येथे चक्राकार गति आहे. त्याचबरोबर हृदयाचे हे कार्य होताना हृदयाच्या हालचालीने ‘लप् डप्’ असा ध्वनिदेखील निर्माण होतच असतो. ही मंत्र अखंड चालू असतो आणि श्‍वास-उच्छ्वास हे चक्रदेखील अविरत सुरूच असते. मंत्र (ध्वनी) आणि चक्र या दोन मूलभूत शक्ती आमच्या जीवनात अखंड कार्यरत असतात.

त्यामुळे चरखा चालवताना आम्ही जेव्हा चक्राला गति देण्याबरोबर म्हणजेच चरख्याची चक्रे फिरवण्याबरोबरच मंत्रही म्हणतो, तेव्हा साहजिकच या दोनही शक्ती परमेश्‍वरी पवित्र मार्गाने आमच्या देहात, जीवनात आपोआप सक्रिय होतात, देहातील, जीवनातील सर्व क्रियांना उचितता प्रदान करतात.

प्रत्येक मानवाच्या भौतिक (स्थूल) देहाबरोबरच प्राणमय आणि मनोमय असे दोन सूक्ष्म व अतिसूक्ष्म देह राहतात. प्राणमय देहाची आकृति भौतिक शरीराप्रमाणेच असते, परंतु ह्या प्राणमय देहास जड अस्तित्व नसून चेतनामय अस्तित्व असते, तर मनोमय देहास भावमय अस्तित्व असते, हे श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज आम्हाला सांगतो.

श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाने मानवी प्राणमय देहातील नवचक्रे म्हणजे नऊ चक्रे सांगितली आहेत- मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सुदर्शन, सत्प्रज्ञा आणि सहस्त्रार अशी ह्या नऊ चक्रांची नावे आहेत. ह्यातील सुदर्शन चक्र व सत्प्रज्ञा चक्र ह्यांचे स्वरूप कंकणाकृति आकाराचे ‘प्रवाहद्वार’ (स्फिंक्टर) ह्या प्रकारचे असते आणि हे प्रवाहद्वार स्वनियंत्रित असते. मानवास फक्त ह्या प्रवाहद्वाराचा संकोच होणार नाही एवढेच पहावयाचे असते.

बाकीची सात चक्रे ही कमलाकार असून त्यांना पाकळ्या असतात आणि त्या पाकळ्या विशिष्ट बीजाक्षरांनी कार्यक्षम असतात. ह्याचाच अर्थ मानवी देहातील ही सात चक्रे म्हणजे पुन्हा जणू चक्र (कमलाकार रचना) आणि मंत्र (बीजाक्षरे) या दोन शक्तींचेच स्वरूप आहे. अंबर चरखा जेव्हा श्रद्धावान चालवतात, तेव्हा त्या अंबर चरख्यामधील चक्रे गतिमान होतात आणि त्याबरोबरच श्रद्धावानाचा मंत्रही सुरू असतो. चरखा चालविण्याच्या ह्या क्रियेद्वारे आम्ही आमच्या देहातील सप्तचक्रांमधील चक्र व मंत्र ह्या दोन्ही शक्तींचा उचित समन्वय घडवून आणतो आणि त्यायोगे आमच्या देहातील ही सप्तचक्रे अधिकाधिक विकसित होऊ लागतात.

ही सप्तचक्रे जसजशी अधिकाधिक विकसित होऊ लागतात तसतशी आमच्या देहातील प्राणशक्ती अनिरुद्धपणे अवघ्या देहात प्रवाहित होऊ लागते. प्राणशक्तिच्या ह्या अनिरुद्ध प्रवाहामुळे आम्हाला शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य तर मिळतेच, त्याशिवाय ह्या तीनही स्तरांवर सामर्थ्य मिळून आमचा अधिकाधिक विकास होऊ लागतो. आमच्या देहातील, म्हणजेच शरीर-मन-बुद्धि यांतील उचित बीजे विकसित होऊ लागतात आणि अनुचित बीजे नष्ट होऊ लागतात. प्राणमय देहातील ही चक्रे मनोमय व भौतिक देहावर नियंत्रण ठेवणारी प्राणशक्तीची केंद्रे आहेत आणि जसजशी ही केंद्रे अधिकाधिक सक्षम होऊ लागतात, तसतसा मानवाचा जीवनविकास सहजपणे होऊ लागतो.

आम्हाला जीवनात अनेक आजार सतावतात. शारीरिक आजार तर असतातच, पण त्याचबरोबर मनाची एकाग्रता नसणे, मन चंचल असणे, मनात वारंवार नैराश्य येणे, नकारात्मक विचार येणे, चुकीच्या दिशेने वारंवार मन भटकत राहणे, मनाची दुर्बलता असे अनेक मानसिक त्रासही आम्हाला भेडसावत असतात. प्रत्येकाला चांगले जीवन जगण्याची इच्छा असते, ह्या समस्यांमधून मुक्त होण्याची  इच्छा असते, पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळत नसते.

या सर्वांवर मात करण्याचा साधा, सरळ, सुंदर आणि सोपा उपाय आहे- ‘चरखा’. प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करत जेव्हा आम्ही चरखा चालवतो, तेव्हा ह्या विश्‍वाच्या, आमच्या जीवनविश्‍वाच्या, आमच्या देहाच्या दोन्ही मूलभूत शक्ती, चक्र व मंत्र ह्या दोन्ही मूलभूत शक्ती उचितपणे कार्यकारी होतात आणि जीवनाचा रथ सुंदरपणे, समर्थपणे विकासाच्या मार्गावरून वाटचाल करू लागतो.

कुणाच्या मनात असा प्रश्‍न येईल की स्थूल पातळीवर चालवलेला चरखा, म्हटलेला मंत्र आमच्या त्रिविध देहांवर, सूक्ष्म व तरल पातळीवरही कार्य कसे करतो? त्याचे पहिले स्पष्टीकरण हेच आहे की स्थूल, सूक्ष्म व तरल ह्या तीन पातळ्या आम्हाला दिसायला वेगळ्या दिसतात, पण त्या एकमेकांपासून वेगळ्या, अलिप्त नाहीत. किंबहुना त्या तीनही पातळ्या एकाच तत्वाच्या तीन अभिव्यक्ती आहेत. समुद्राच्या लाटा, समुद्राचे किनार्‍यावरून दिसणारे पाणी आणि समुद्राच्या तळाशी असणारे पाणी ह्या तीन पातळ्या आमच्यासाठी वेगळ्या दिसत असतील, पण शेवटी त्या तीन वेगळ्या नसून तो एकच समुद्र असतो. तसेच हे त्रिविध देह हे शेवटी त्या जीवात्म्याच्याच तीन अभिव्यक्ती आहेत. त्यामुळे ह्यातील एका पातळीवर घडणार्‍या प्रक्रियेचे परिणाम अन्य पातळ्यांवरही होतातच.

आता ह्या प्रश्‍नाचे दुसरे स्पष्टीकरण, जे आम्हाला परिणाम कसा होतो. ते कळावे यासाठी उदाहरणादाखल आहे. आम्हा डॉक्टरांकडे जेव्हा रुग्ण येतो, तेव्हा त्याला उपचाराचा एक भाग म्हणून ‘इंजेक्शन’ द्यावे लागते. जेव्हा डॉक्टर रुग्णाला दंडावर इंजेक्शन देतो, तेव्हा रुग्ण जर म्हणाला-‘मला त्रास घेत आहे पायाकडे, किंवा अन्यत्र आणि तुम्ही इंजेक्शन मात्र दंडावर कसे देता?’ ‘मला कुत्रा चावला आहे पायाला आणि तुम्ही दंडावर (पूर्वी पोटावरही घ्यावी लागत) इंजेक्शन कसे काय देता?’ किंवा एखादे कमरेवरच घेण्याचे इंजेक्शन असते, त्यावेळी जर रुग्ण म्हणला माझा हात दुखत आहे तुम्ही कमरेवर इंजेक्शन का देता?’ तर...

ह्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे डॉक्टर शांतपणे रुग्णाला देतात की बाबा हे! तुझ्या दंडावर किंवा कमरेवर दिलेले इंजेक्शन हळूहळू तुझ्या सर्व शरीरावर पसरणार आहे आणि ते तुझ्या वेदना शमवणार आहे. म्हणजेच इंजेक्शन जरी एका ठिकाणी दिले (इन्ट्रामस्क्युलर) तरी ते सर्व शरीरावर परिणाम करते, सर्व शरीरभर पसरते, तसेच चरखा जरी स्थूल पातळीवर चालवताना आम्ही दिसत असलो, त्यावेळेचा मंत्र मनातल्या मनात किंवा तोंडाने म्हणतान दिसत असलो, तरी या मंत्र-चक्र शक्तीचे कार्य सर्वच पातळ्यांवर एकाच वेळेस होतच असते.

हे स्पष्टीकरण समजण्याने आम्ही विश्‍वासपूर्वक, अधिक प्रेमाने चरखा चालवू आणि चरख्याने हा लाभ कसा तीनही पातळ्यांवर मिळतो ते प्रत्यक्ष अनुभवू कारण शेवटी हे समजल्यानंतर त्याचा अनुभव घेणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

ह्या सर्व अभ्यासातून आम्हाला चरख्याचा आध्यात्मिक पैलू कळला. हा चरखा (१३ कलमातील चरखा) भक्तिमय चरखा आहे, हा मानवाचा परमेश्‍वरी विधायक पवित्र मार्गाने विकास करणाराच आहे, हा निव्वळ यांत्रिक कवायत मुळीच नाही. तोंडाची टकळी चालवून वाफ दवडण्यापेक्षा आम्ही ही चरख्याची टकळी चालवू, मग आमचे गुंतलेल मन सुतासारखे सरळ करण्यास परमात्मा समर्थ व तत्पर आहेच.

चरखा परमेश्‍वरी मार्गाने श्रद्धावान मानवांची मने जोडण्याची, नवनिर्माणाची कला आम्हाला शिकवतो आणि परमेश्‍वरी मार्गावरूनच पुढे घेऊन जातो. शेवटी विघातक शक्तीचे रूप कितीही मोठे अक्राळ विक्राळ दिसले तरीही परमेश्‍वरी विधायक शक्तीपुढे ते पूर्णपणे फोल आहे. मधुफल २२१ आम्हाला सांगते- ‘तोडफोड करण्याचे काम अगदी निर्बुध मनुष्यसुद्धा आणि सहजतेने करू शकतो. विध्वंस करायला काही फार मोठी ताकद लागत नाही. परंतु जोडण्याला मात्र खूप मोठी ताकद लागते.’

जोडण्याची आणि नवीन निर्माणाची प्रक्रिया ज्याला जमते तोच खराखुरा सुखी होतो आणि ही कला मानव मर्यादामार्गाच्या सहाय्यानेच पूर्णपणे आणि सहजतेने शिकू शकतो.

मला सांगा, एक मोठ्यातला मोठा वृक्ष किंवा त्याची सर्व पाने कुणीही सहजतेने तोडू शकेल. परंतु एका लहानशा झाडाचे तोडले गेलेले पानसुद्धा कुणी सहजतेने परत जोडू शकेल काय?

चरखा आम्हाला परमात्म्याच्या मंत्र व चक्र ह्या दोन विधायक शक्तींशी जोडून ठेवतो आणि आम्हाला कधीही  कर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून देवायानपंथावरून दूर जाऊ देत नाही. त्याचबरोबर चरखा ज्याक्षणी आम्ही चालवू लागतो, परमात्म्याचा पवित्र मंत्र म्हणू लागतो, त्याचक्षणापासून देवयान पंथावरचा आमचा प्रवास सुरू होतो.

परमात्म्याच्या, ह्या महाविष्णुच्या हातातील आयुध आहे-सुदर्शन चक्र. आम्हा सर्वांना आमचा प्रतिपाळ व्हावा म्हणून ह्या सुदर्शन चक्राची छाया आमच्यावर रहावी असे वाटत असते. पण त्यासाठी ह्या रामाचा वानरसैनिक बनणे गरजेचे असते आणि त्या वानरसैनिकाच्या हातातील एक आयुध आहे- ‘चरखा’! श्रद्धावानाच्या परमात्म्याच्या हाती, ह्या महाविष्णुच्या हाती आयुध आहे ते सुदर्शन, तर त्या भगवंताच्या श्रद्धावानाच्या हाती आयुध आहेख त्या महाविष्णुनेच श्रद्धावानाला अनुचिताशी लढण्यास आणि उचिताचा विकास करण्यास दिलेले आयुध आहे, ‘चरखा’!    


(सौजन्य : दैनिक प्रत्यक्ष चरखा विशेषांक )

No comments:

Post a Comment